ही गोष्ट आहे पिंटूची.... ४ वर्षाच्या पिंटूची गोष्ट त्याच्याच शब्दात.... त्याचे विचार... त्याचे छोटेस विश्व... आणि त्याची स्वप्ने....
भाग १
मी प्रशांत शांताराम तेजम . आई - पप्पानी सांगितले आहे नाव विचारले कि , पूर्ण नाव सांगावे . मला ना पप्पांना 'बाबा ' बोलायचे असते पण माझ्या पप्पांच्या आईने बाबाला 'पप्पा' बोलायला शिकवले म्हणून सवय झाली . तिला 'आजी ' बोलले आवडत नाही . मला कारण माहित नाही पण कदाचित तिला Old झाल्यासारखे वाटत असेल .... जाऊदे .... माझे असे आहे की सांगायचे असते ते राहते आणि नको ते सांगतो म्हणून आई सारखी इतरांना सांगत असते कि 'पिंटूच्या नादी लागू नका '....
पिंटू म्हणजे मीच ....
हां मी कुठे होतो ? माझे नाव सांगून झाले... आता सगळे म्हणतात की मी आता मोठा झालो आहे, शाळेत जायला हवे. शाळा लवकरच सुरु होणार आहे. या मोठ्या लोकांना काही कळतच नाही, कधी चूक झाली तर म्हणतात की "मोठा झाला आहेस " आणि ते करतात ती कामे केली तर म्हणतात की "अजून लहान आहे" नक्की मी कोण आहे ????
जाऊदे ना.... मला वाटते कि, अजून मी लहान आहे कारण आजोबा म्हणतात कि मी फक्त २ पावसाळे बघितले आहेत पण मला वाटते की मी २ पावसाळे , ३ उन्हाळे आणि २ हिवाळे बघितले आहेत. त्यांना हे मोजून सांगितले की ते हसतात. मी काही बोलले की ते असेच हसतात. गेल्यावेळी असेच झाले. झाले काय मला रस्त्यावरून चालताना मला दुकानाची नावे, बस नो वाचायची सवय आहे. एका Truck वर लिहले होते "बुरी नजर वाले तेरा मुंह काला". मग मी म्हणालो की, बुरी नजर ही तो डॉक्टर को दिखाव, मुंह कायको काला करने को ? असे बोललो आणि ते हसायला लागले.... का हसले माझ्या उत्तराला की हिंदीला ?
नुकताच हिंदी फिल्म्स बघायला सुरवात केली आहे ... मी TV वर अमर अकबर अंथोनी बघितला.... खूप मोठा होता Picture.... काय काय होते त्यात 3 भाऊ हरवतात मग परत भेटतात.... आईचे डोळे साई बाबा परत आणतात.... चांगले प्राण पप्पा वाईट होतात परत चांगले होतात.... मी तर दमलो सगळे लक्षात ठेवता ठेवता.... काल मी बबली कडे गेलो होतो खेळायला तेंव्हा ' सत्यम शिवम सुंदरम' फिल्म लागली होती माहित नाही का पण मला त्याच्या पप्पानी आम्हाला 'सत्यम शिवम सुंदरम' फिल्म बघायला दिली नाही.... ते म्हणाले चांगला नाही आणि आम्हाला खेळायला पाठवले, मी परत आलो तर ते बघत होते ती फिल्म .... जाऊदे ना.... मी नंतर कधी तरी बघेन.... चला Bye.... मी आता खेळायला जाणार आहे ...
- पिंटू
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा